जल दुर्ग जंजिरा

जल दुर्ग जंजिरा

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनने आयोजित किल्ला प्रदर्शनात आमच्या PTVA इंग्लिश मिडीयम, अंधेरी शाळेच्या पालकांना मुरुड जंजिरा हा जल दुर्ग बनविण्याची संधी मिळाली. आणि आमच्यातले इतिहास प्रेमी, हस्तकलाप्रेमी आणि हौशी अशा ९ पालकांचा एक गटच तयार झाला.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मृणालिनी म्हेत्रे यांनी किल्ला प्रदर्शनाचे नियम आणि अटी समजावून सांगितल्या तेव्हा कळले कि, संस्थेच्या इतर शाखांमधून पण पालक आणि महाविद्यालयातील विद्यार्थी इतर वेगवेगळे किल्ले बनविणार आहेत.
आम्ही पालकांनी ३-४ वेळा भेटून प्रत्येकाने जबाबदार्‍या वाटून घेतल्या. आम्हाला किल्ला ५ दिवसात बनवायचा होता ते सुद्धा प्रत्येकाची नोकरी व्यवसाय सांभाळून हीच खरी तारेवरची कसरत होती.
म्हणता म्हणता किल्ला बनविण्या साठीचा पहिला दिवस उजाडला. संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी, मुख्याध्यापकांनी आणि इतर मान्यवरांनी गणराया चरणी आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रदर्शन निर्विघ्न पार पडावे यासाठी प्रार्थना केली, पुढे भूमि पूजन करून संस्थेच्या प्रत्येक शाखेला त्यांना ठरवून देण्यात आलेली जागा दिली आणि प्रत्येकाने आधीच सांगितल्या प्रमाणे किल्ल्या साठी लागणारे साहित्य दिले.
आता खऱ्या अर्थाने आम्ही प्रत्यक्ष किल्ला बांधणीच्या कामाला सुरवात करीत होतो. प्रथम आधीच तयार करून आणलेल्या नकाशा अनुसार किल्ल्याच्या सीमा आखण्यात आल्या. कागदावर सोपी वाटणारी ही गोष्ट प्रत्यक्षात अमलात आणायला आम्हाला ८ तास लागले, पण प्रत्येक पालकाने जिद्द आणि संयम याचा अचूक मेळ साधत पुढील 5 दिवसात किल्ला पूर्ण तयार केला. यात विशेष करून महिला वर्गाचं खरंच कौतुक कि,त्यांनी घर, नोकरी सांभाळून ही जबाबदारी खूप समर्थपणे पार पाडली. वेळ प्रसंगी अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवस रजा घेऊन काही जण येत होते.
किल्ला प्रदर्शनाचा दिवस उजाडला. उद्घाटनाला प्रसिद्ध इतिहास प्रेमी, अभिनेते ‘भटकंती’ फेम श्री. मिलिंद गुणाजी सर येणार होते. त्यांना किल्ला कसा बनविला आणि त्यातले बारकावे सांगणे म्हणजे खरोखरच आव्हान होते. पण आपल्या पालकांनी ते लीलया पार पाडले. पुढील दोन दिवस शाळेतले विद्यार्थी, शिक्षक इतर नागरिक अशा असंख्य लोकांनी ह्या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद दिला.
या प्रदर्शनात बऱ्याच इतिहास तज्ज्ञांनी आम्हाला बरीच नवीन माहिती त्यातील बारकावे सांगून आमच्या ज्ञानात भर तर घातलीच पण आम्ही केलेल्या किल्ल्याचे कौतुकही केले. त्याच प्रमाणे संस्थेने खलित्याच्या स्वरुपात प्रशस्तीपत्रक देऊन आम्हा पालकांचे कौतुक केले.

किल्ला : मुरुड जंजिरा (जिल्हा रायगड, महाराष्ट्र)
किल्ल्याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे : ४ भव्य दरवाजे, १९ बुरूज, गोड्या व खा-या पाण्याचे दोन स्वतंत्र तलाव, गुप्तमार्ग व कलाल बांगडी, लांडा कासम आणि चावरी या तोफा.
विशेष आभार मुख्याध्यापिका सौ.मृणालिनी म्हेत्रे, शिक्षक वर्ग श्रीमती अश्विनी नरवणे, सौ. शोभना मदनराज, सौ.सुप्रिया साळकर, सौ.आरती कालेकर आणि आमचे लाडके श्री. अक्षय दिघे सर.
आम्ही पालक
श्री अभिजीत सोमण, श्री प्रशांत भगत, श्री सूरज गावडे, सौ. माधवी मेस्त्री, सौ. मधुरा शिर्के, सौ. श्रेया पांचाळ, सौ. सविता राणे, सौ. तेजश्री शितोळे, सौ. ज्योती पाटील

– श्री अभिजीत सोमण

 

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow