रूजवू मराठी, फुलवू मराठी ….

रूजवू मराठी, फुलवू मराठी ….

२७ फेब्रुवारी अर्थात मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन, अंधेरीच्या शाळेत विविध कार्यक्रमांचे, स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठीतील आद्यग्रंथ ज्ञानेश्वरी व पालखीचे पूजन करून शाळेच्या मैदानावर ग्रंथदिंडी नेण्यात आली. या ग्रंथदिंडीत लेझीम पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यानंतर शाळेच्या सभागृहात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तसेच कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रसेविका समितीच्या मुंबई जिल्हा अध्यक्षा श्रीमती सुवर्णा खोले व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्या रिद्धीमा मेहंदळे या प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमास उपस्थित होत्या. मराठी भाषेचे व मराठी भाषा गौरव दिनाचे महत्त्व या निमित्ताने विद्यार्थ्यांना विशद करण्यात आले. शाळेतील गायन शिक्षिका श्रीमती काव्य राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरवगीत सादर केले. मराठी कविता गायन/ गीत गायन या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांनी आपापल्या कविता व गीते सादर केली. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या श्रीमती सुवर्णा खोले यांनी अहिल्याबाई होळकर यांचे जीवन चरित्र कथाकथनाच्या माध्यमातून रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांपुढे उलगडून दाखवले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने अगोदरच्या आठवड्यात घेतल्या गेलेल्या विविध स्पर्धांची पारितोषिके जाहीर करून मुख्याध्यापिका श्रीमती मृणालिनी म्हेत्रे व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा समारंभ पार पडला. 

पालकांसाठी घेण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला देखील उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. शिक्षकांसाठीही विविध स्पर्धा (शब्द कोडे, शब्द शोध, शीघ्रकवी, मराठी गाण्यांच्या भेंड्या) घेण्यात आल्या. सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळे मराठी भाषा गौरव दिनाचा संपूर्ण कार्यक्रम उत्साहात व देखण्या पद्धतीने साजरा झाला.

 

सौ. स्वाती बापट

सहाय्यक शिक्षिका, 

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनची इंग्रजी माध्यम शाळा, अंधेरी

Leave a Reply


Latest News & Updates
Slideshow