पी. टी. व्ही. एज्. इंग्लिश मीडियम स्कूल, अंधेरीने मराठी राजभाषा गौरव दिन अतिशय उत्साहात साजरा केला
पी. टी. व्ही. एज्. इंग्लिश मीडियम स्कूल, अंधेरी
‘मराठी राजभाषा गौरव दिन’
दि. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी पी. टी. व्ही. एज्. इंग्लिश मीडियम स्कूल, अंधेरी
या शाळेत ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ अतिशय उत्साहात साजरा झाला. या विशेष दिवसाची सुरुवात विद्यार्थ्यांनी मराठीचा जागर ही प्रतिज्ञा म्हणून केली. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या मराठी मंडळाने अनेक उपक्रमांचे आयोजन केले होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मृणालिनी म्हेत्रे यांनी ग्रंथपूजन केले. त्यानंतर मराठी भाषेचा जयघोष करीत ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. ग्रंथदिंडीच्या अग्रस्थानी महाराष्ट्राचा पारंपारिक वेश परिधान केलेले लेझीम पथक होते. ग्रंथदिंडीमध्ये पूजन केलेल्या ग्रंथांची पालखी व त्यामागे इयत्ता दुसरी व सहावीची मुले पारंपारिक वेशात मराठीचा जयघोष करत दिंडी सोबत चालत होती. विद्यार्थ्यांनी मराठी भाषा व निसर्गाचे संवर्धन यांची महती सांगणारे घोषवाक्यांचे फलक हाती घेत मराठीचा जागर केला. शाळेच्या सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचा सहभाग ह्या कार्यक्रमात होता. कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीताने झाली. त्यानंतर लेझीम पथका द्वारे कार्यक्रमात ग्रंथदिंडीचे दिमाखात आगमन झाले. मराठी दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. पहिली ते सहावीच्या कथाकथन स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कथा सादर करून सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले. त्यानंतर ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे मराठी गौरव गीत विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत गायले. इयत्ता पाचवीतील चि. जय डांगे व चि. हर्ष शेटकर या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला. इयत्ता चौथी, पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘मराठी गौरव गीत’ हे बहारदार नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कथाकथन व मराठी हस्ताक्षर स्पर्धेच्या बक्षीस समारंभानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून शिक्षकांसाठी पारंपारिक वेशभूषा व मराठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धांमध्ये सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
********************
















