मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या अंधेरी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी भाषा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने दिनांक १४ जानेवारी ते २८ जानेवारी, २०२६ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान निर्माण करणे, भाषेचा शुद्ध वापर वाढवणे व साहित्याची ओळख करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
या पंधरवड्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचा आढावा पुढील प्रमाणे–
१) वाचन प्रेरणा उपक्रम: – इयत्ता ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी वृत्तपत्र वाचन व श्रवण घेण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी मराठी कथांचे व कवितांचेही वाचन केले.
२) हस्ताक्षर स्पर्धा: – इयत्ता २ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांची शुद्ध व सुबक लेखन क्षमता वाढवण्यासाठी ही स्पर्धा पूरक ठरली.
३) खेळूया शब्दांशी:- या उपक्रमांतर्गत इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषाविषयक विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. हे खेळ इयत्ता आठवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांनीच तयार केलेले असून या मध्ये कोडी, अक्षरांचा योग्य क्रम लावून शब्द तयार करणे, चित्र आणि शब्द यांचा मेळ, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द ओळखणे इत्यादी विविध खेळांचा समावेश होता.
महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांची माहिती देणारा “पर्यावरण पूरक माहितीसंच” हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
४) ग्रंथ प्रदर्शन:- मराठी कथा, कविता संग्रह, कादंबरी, प्रवासवर्णने, चरित्र, आत्मचरित्र, बालसाहित्य, पुरस्कारप्राप्त पुस्तके प्रदर्शनात ठेवली गेली. तसेच शाळेच्या ग्रंथपाल सौ. स्वरा जंगम यांनी विद्यार्थ्यांसाठी पुस्तक परीक्षण, पुस्तकाचे मनोगत यांसारख्या उपक्रमांचे आयोजन केले होते.
५) प्रकल्प प्रदर्शन:- विद्यार्थ्यांनी मराठी भाषाविषयक केलेल्या विविध प्रकल्पांचे प्रदर्शन या निमित्ताने भरवण्यात आले.
६) विशेष उपक्रम:- उपरोक्त उपक्रमांव्यतिरिक्त मराठी शिक्षिका सौ.सुप्रिया साळकर, सौ. हर्षदा मुलमुले, सौ. स्वाती बापट, सौ. चरिता कुलकर्णी व सौ. कल्पिता भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सादरीकरण केले
त्याचा आढावा पुढीलप्रमाणे –
इयत्ता पहिली व दुसरी :- बालकवितांचे सादरीकरण, कथाकथन.
इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवी:- गणपती नमन , गाऱ्हाणे व महाराष्ट्राची लोककला – भारुड यांसारख्या पारंपरिक कार्यक्रमांचे सादरीकरण, तसेच ‘प्रेरणेचे दीपस्तंभ’ – ज्यांनी इतिहास घडवला अशा महान व्यक्ती- अहिल्याबाई होळकर, छत्रपती शाहू महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, बहिर्जी नाईक इत्यादींच्या वेशात विद्यार्थ्यांनी एकपात्री प्रयोग सादर केले.
‘बोलक्या बाहुल्या’ हा एक आगळावेगळा आणि कल्पकतापूर्ण कार्यक्रम ठरला. याशिवाय ‘आपले मदतनीस, ‘वाहनांचे गाणे’, समूहगीते या उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
इयत्ता सातवी:- मराठी शुद्धलेखनासाठी विद्यार्थ्यांना ऱ्हस्व आणि दीर्घ यांचे नियम कृतिशील पद्धतीने समजण्यासाठी व्याकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
इयत्ता आठवी व नववी:- विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. तसेच शाळेतील चित्रकला शिक्षिका सौ. अश्विनी नरावणे यांनी विद्यार्थ्यांकडून ‘मराठी भाषेतील सुविचार’ हा विषय घेऊन ‘पुस्तक खूण बनवणे’ (Bookmark Making Activity) हा उपक्रम करून घेतला.
या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. या पंधरवड्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल आदर व अभिमान वाढला. मराठी भाषेची शुद्धता, शब्द संपदा व साहित्याची ओळख घडली. अशा उपक्रमांमुळे मराठी भाषा संवर्धनाला निश्चितच चालना मिळते हे निर्विवाद !
सौ. कल्पिता भिडे
मराठी शिक्षिका, पा.टि.वि.अंधेरी










